राज्य सरकारच्या त्या भूमिकेमुळेच संभाजीराजेंची उपोषणातून माघार
राज्य सरकारकडून मागण्या मान्य, अखेर खासदार संभाजी छत्रपतींकडून उपोषण मागे घेण्याचा निर्णय

SambhajiRaje Hunger Strike : सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. खासदार संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेतली. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन या मंत्र्यांनी संभाजीराजेंना देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर एका लहान मुलाच्या हातून फळाचा रस घेत संभाजीराजे यांनी आपण उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.
तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढेच नव्हे तर संभाजीराजे यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत. काहीच ठेवायचं नाही असा निर्णयच सरकारने घेतला असून या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
गेल्या 3 दिवसांपासून खासदार संभाजीराजे आझाद मैदानात उपोषणाला बसले होते या उपोषणाला अनेक मराठा संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. तेव्हापासून अनेक संघटना येऊन पाठिंबा दर्शवित होत्या. तसेच राज्य सरकारमधील मंत्री देखील आंदोलन स्थळी येऊन भेट देऊन गेले होते.