मुंबई पालिकेच्या लाखो वस्तूंची चोरी, पालिकेने घेतली पोलिसांत धाव
सप्टेंबर 2021 ते 8 फेब्रुवारी 2022 या कालावधीत सुमारे 1 लाख 83 हजार रुपये किमतींच्या वस्तुंची चोरी झाली.

Mumbai BMC Update : वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलावरील दुभाजकाचे स्टड पोस्ट आणि इतर सुट्या भागांची वारंवार चोरी होत असून त्या संदर्भात अखेर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर 2021 ते 8 फेब्रुवारी 2022 या कालावधीत सुमारे 1 लाख 83 हजार रुपये किमतींच्या वस्तुंची चोरी झाली असून त्याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 379 अन्वये देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सहायक अभियंता ज्ञानेश्वर दगडू उकिर्डे यांनी देवनार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. वीरमाता जिजाबाई भोसले मार्ग घाटकोपर-मानखुर्द जोडमार्गावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आले आणि हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
त्यानंतर सप्टेंबर 2021 पासून दिनांक 8 फेब्रुवारी 2022 या कालावधीत या पुलावरील लोखंडी दुभाजकाचे जवळपास 200 स्टड पोस्ट आतापर्यंत चोरीस गेले आहेत. प्रत्येक स्टड पोस्ट हे अडीच फूट उंचीचे आहे. त्याची किंमत सुमारे 1 लाख 20 हजार रुपये इतकी आहे.
या उड्डाणपुलावरील वाहनांची वर्दळ आणि सुट्या भागांची होत असलेली चोरी या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने मुंबई पोलिस वाहतूक शाखेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. उड्डाणपुलावर सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्पीडोमीटर लावण्याची विनंती महानगरपालिका प्रशासनाने या पत्रांद्वारे पोलिसांकडे केली आहे.