मुंबईतील ‘या’ उद्यानात होणार पुष्पवाटिका, योगकेंद्र, खुली व्यायामशाळा, मुलांची खेळणी
उद्यानामध्ये विविध वाद्यांच्या प्रतिकृतींसह मुलांसाठी खेळणी, खुली व्यायमशाळा, योगकेंद्र इत्यादी सुविधा आहेत.

Mumbai Guarden : अंधेरी पश्चिम परिसरात असणा-या मुंबई महानगरपालिकेच्या संगीतकार अनिल मोहिले मनोरंजन उद्यान येथे विविध संगीत वाद्यांच्या भव्यदिव्य आकारातील आकर्षक व प्रत्ययकारी प्रतिकृती आहेत. या प्रतिकृतींची डागडुजी, रंगरंगोटी करण्यासह परिरक्षणाची कामेदेखील नुकतीच पूर्ण करण्यात आली आहेत.
यामुळे या उद्यानाला एक नवी झळाळी व आकर्षक रुपडे बहाल झाले आहे. या उद्यानामध्ये विविध वाद्यांच्या प्रतिकृतींसह मुलांसाठी खेळणी, खुली व्यायमशाळा, योगकेंद्र इत्यादी सुविधा आहेत. तर उद्यानातील पदपथांच्या कडेलाच असणा-या ध्वनिक्षेपकांमधून संगीत ऐकविण्याची व्यवस्थाही निर्धारित वेळी या उद्यानात करण्यात येते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण यांच्या नेतृत्वात व उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या पुढाकाराने या उद्यानामध्ये विविधस्तरिय कामे करण्यात आली आहेत.
ज्यामुळे या उद्यानास नुकतीच नवीन झळाळी प्राप्त झाल्यानंतर आता केवळ परिसरातील नागरिकच नव्हेत, तर परदेशी पर्यटक देखील या उद्यानास भेट देत आहे
अंधेरी पश्चिम येथील चार बंगला नजीक व मॉडेल टाऊन परिसरात असणा-या संगीतकार अनिल मोहिले मनोरंजन उद्यान याची महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये
हे उद्यान तब्बल १ लाख १ हजारांपेक्षा अधिक चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात बहरलेले उद्यान आहे
या उद्यानात तबला, हार्मोनियम, वीणा, सितार, गिटार इत्यादी विविध वाद्यांच्या प्रत्ययकारी प्रतिकृती आहेत.
या प्रतिकृतींसोबत सेल्फी, छायाचित्रे काढण्यासाठी नागरिकांची व विशेष करुन लहान मुलांची लगबग नेहमीच दिसून येते.
या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर व प्रवेशद्वारा नजीकच्या भिंतीवर देखील विविध वाद्यांच्या प्रतिकृती चितारलेल्या आहेत.
यानुसार उद्यानातील भिंतींवर की-बोर्ड, मृदुंग, तबला-डग्गा व संगीत चिन्हांचा वापर करुन आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे.
या उद्यानात पुष्पवाटिका, पुष्पकुंज यासह फुले असणा-या वेलींनी सुशोभित केलेला ‘पुष्पलता मंडप’ देखील आहे. त्याचबरोबर विविध प्रजातींची झाडे, फुलझाडे आणि आकर्षक हिरवळ देखील या उद्यानामध्ये ठिकठिकाणी आहे.
या उद्यानातील पदपथांच्या लगत स्पीकर बसविण्यात आले असून, याद्वारे दररोज ठरलेल्या वेळी मंद आवाजातील संगीताचे सूर पाझरत असतात.
या उद्यानात खुली व्यायामशाळा, योगाकेंद्र, व्हॉलीबॉल मैदान, आसन व्यवस्था इत्यादी सोई-सुविधा आहेत.