आपलं शहरलोकल

मुंबई महानगरात कोविड लसीकरणाने ओलांडला 2 कोटी मात्रांचा टप्पा

कोविड लसीची पहिली आणि दुसरी मात्रा तसेच प्रतिबंधात्मक मात्रा यांचा देखील त्यात समावेश आहे.

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतर्गत, पात्र व्यक्तिंना मिळून 2 कोटी मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने (Mumbai Vaccination Update) गाठला आहे. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे. कोविड लसीची पहिली आणि दुसरी मात्रा तसेच प्रतिबंधात्मक मात्रा यांचा देखील त्यात समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

मुंबईसह देशभरात दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. टप्प्या-टप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱयांसाठी लसीकरण सुरु झाले. फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी 5 फेब्रुवारी 2021; 60 वर्ष वयावरील तसेच 45 ते 59 वयोगटातील नागरिकांना त्यानंतर 18 ते 45 आणि आता 15 ते 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

मुंबई महानगरात वेगाने व अधिकाधिक नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख यांच्या निर्देशानुसार आणि महापौर किशोरी पेडणेकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवित आहे.

23 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2 कोटी कोविड लस मात्रांचा टप्पा गाठण्यात आला. यामध्ये 1 कोटी 5 लाख 85 हजार 580 पहिल्या मात्रा, 90 लाख 92 हजार 118 दुसरी मात्रा तर 4 लाख 29 हजार 478 प्रतिबंधात्मक मात्रा समाविष्ट आहेत.

सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस वेळेत घ्यावेत, विशेषतः दुसरी मात्रा देय असलेल्यांनी वेळेत डोस घेवून लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments