निर्बंध कमी होणार, ‘त्या’ तारखेंपर्यंत तिसरी लाट ओसरणार, आरोग्यमंत्री नेमकं काय म्हणाले…
सध्या राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यापर्यंत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली आहे.

New Restrictions : सध्या राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यापर्यंत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली आहे. सध्या राज्यात मास्क मुक्ती केली जाणार नाही. त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.
राज्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घ्याव असं आवाहन देखील टोपे यांनी केलंय. निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
आज राज्यात 9 हजार 815 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 3 हजार 502 रुग्ण नव्याने आढळले आहेत. तर मुंबईत कोरोनाचे नवीन रुग्ण 288 आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे मुंबईत एकही इमारत पालिकेकडून सील करण्यात आलेली नाही.
तर राज्यात सध्या सर्वाधिक १४ हजार ४६१ रुग्ण पुण्यात उपचाराधीन आहेत. त्या खालोखाल नागपूर, नगर, मुंबई, औरंगाबाद आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील सुमारे ६० टक्के उपचाराधीन रुग्ण या जिल्ह्यांमध्ये आहेत.