Sandeep Deshpande : मराठी माणसाच्या हक्काच्या मुंबईत पालिकेची 90 टक्के कंत्राट अमराठी लोकांना, संदीप देशपांडे यांची धक्कादायक माहिती
शिवसेना अडचणीत आल्यावर मराठी माणसाची आठवण होते, अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली.

मुंबई : राज्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. यात मनसे नेते संदीप देशपांडे Sandeep Deshpande) यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुंबईत मराठी माणसांची संख्या कमी होताना दिसत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तसेच, पालिकेच्या 90 टक्के कामांचे कंत्राट अमराठी माणसांना मिळते, अशी धक्कादायक माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
“शिवसेना अडचणीत आल्यावर मराठी माणसाची आठवण होते”
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर खोचक शब्दात टीका करत, शिवसेनेवर गंभीर आरोप केले. tv9 मराठीशी संवाद साधताना ते म्हणतात, जेव्हा जेव्हा शिवसेना अडचणीत येते तेव्हा तेव्हा त्यांना मराठी माणसाची आठवण होते. एकीकडे आदित्य साहेबांनी वरळीत लावलेले ‘केम छो’ बॅनर लावतात. त्यावेळी त्यांना मराठी माणसांची आठवण होत नाही का? तसेच त्यांनी उत्तर भारतीय दिवस साजरा केला त्यावेळी त्यांना मराठी माणसांची आठवण झाली नाही का?
मुंबईत सध्या पालिका निवडणुका तोंडावर आल्याने आपला झेंडा पालिकेवर फडकवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आपल्या कामांचा गाजावाजा करताना दिसतात. तर दुसरीकडे विरोधक शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.
“संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा”
साडेतीन नेत्यांची पोलखोल करणार होते, मात्र तर काहीही झाले नसल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हंटले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा फोल ठरला, सर्वांची पुरती निराशा केली. त्यामुळे राऊत यांच्यावर फसवणुकीचा, 420 चा गुन्हा दाखल व्हावा, अशी भावना देशपांडे यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला झालेली गर्दीवर देशपांडे यांनी निशाणा साधत तेव्हा कोरोना पसरला नाही का? असा थेट सवाल केला.