दक्षिण मुंबईत शेवटी दिसलेल्या वाघाला 200 वर्ष पूर्ण, पालिकेच्या शाळांमध्येही वाघोबा क्लब
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वाघोबा क्लब स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Waghoba Club : मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी, निसर्ग सान्निध्यामध्ये त्यांना भटकंती करता यावी तसेच अन्नसाखळीतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वाघाची माहिती व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वाघोबा क्लब स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथील गोवालिया टँक येथे सुमारे 200 वर्षांपूर्वी वाघाचे दर्शन झाले होते. या घटनेला 200 वर्षे पूर्ण झाली आहेत. व्याघ्र दर्शनाच्या या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त खाकी हेरिटेज फाउंडेशन, किड्स फॉर टायगर्स आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गोवालिया टँक येथे आज मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री ठाकरे यांनी ही घोषणा केली.
9 फेब्रुवारी 1822 रोजी मलबार हिलवरून एक वाघ खाली आला आणि त्याने गोवालिया टँक येथील तळ्यामध्ये तहान भागवली. त्यानंतर तो हर्मिटेज आणि प्रोस्पेक्ट लॉजमध्ये असणाऱ्या टेकडीवर पसार झाला. त्याच्या पायाचे ठसे दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा स्पष्ट दिसत होते. मुंबईतील प्राणी, पक्षी, कीटक आणि सागरी जीवसृष्टी आणि एकूणच निसर्ग, त्यातील विविध जीवघटक, त्यांचे परस्परांवर अवलंबून असलेले जीवित्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक आहे.
As we mark 200 years of the last tiger spotting at Gowalia Tank, August Kranti Maidan, we had a tiger again at the very same place, along with school kids of the @mybmc schools.
Today we announce that the BMC will have its own Waghoba Club in schools for nature trails. pic.twitter.com/mFPktBRhEd
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 9, 2022