
MMRDA Bridge Open : घाटकोपरमधील छेडा नगर जंक्शनला सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) ला जोडणारा 6.45 किमी लांबीचा उड्डाणपूल 14 मार्चरोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) उघडला. अनेक लोकांकडून आणि विरोधी पक्षांकडून टीका झाल्यानंतर एमएमआरडीएने काही दिवसांपूर्वी बांधकाम पूर्ण होऊनही 14 मार्चला हा उड्डाणपूल चालू केला आहे. उपनगर मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून हा उड्डाणपूल सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला आहे.
काम पूर्ण होऊनही ते जनतेसाठी खुले करण्यात आले नाही आणि मंत्र्याच्या हस्ते उद्घाटनाची वाट पाहत आहे, असा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटे यांनी केला होता. रविवारी 13 मार्च रोजी मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उड्डाणपुलाला भेट दिली. तसेच उड्डाणपुलाची एक बाजू वाहनांच्या वाहतुकीसाठी खुली करण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले. या उड्डाणपुलामुळे ठाणे, मानखुर्द, नवी मुंबई आणि पुणे येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच 249 कोटी खर्च करून छेडा नगर जंक्शनची गर्दी कमी करण्यासाठी नियोजित केलेल्या 3 उड्डाणपुलांचा हा एक भाग आहे. याशिवाय मुंबई ते ठाणे दिशेदरम्यान 680 मीटरचा एक उड्डाणपूल आणि मानखुर्द ते ठाणे दिशेदरम्यान 1.2 किमीचा उड्डाणपूल यांचा 2 उड्डाणपूलांमध्ये समाविष्ट आहे.