विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या इमारतींच्या ओसी प्रकरणात कुलगुरूंचे दुर्लक्ष

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली मागील 2 वर्षांपासून ओसी प्रकरणाबाबत मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत आहे.

Mumbai University Buildings : मुंबई विद्यापीठाच्या इमारतींच्या ओसी प्रकरणात कुलगुरु लक्ष देत नसल्याची बाब समोर आली आहे. 8 महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने कुलगुरु यांस पत्र पाठवूनही मुंबई विद्यापीठाने त्या पत्रास गांभीर्याने घेतले नाही, असा दावा मुंबई महानगरपालिकेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पाठविलेल्या पत्रात केला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली मागील 2 वर्षांपासून ओसी प्रकरणाबाबत मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील 38 इमारतींच्या ओसी बाबत विकास व नियोजन खात्याच्या विशेष कक्षाचे कार्यकारी अभियंता यांनी अनिल गलगली यांस कळविले की, प्रत्येक वैयक्तिक प्रस्तावाची ओसी मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुपालनांची यादी कुलगुरूंना कळविण्यात आली होती.

दिनांक 12 जून 2021 रोजी कळविण्यात आले होते की, आजतागायत विद्यापीठ प्राधिकरणाकडून आवश्यक पूर्ततेसह ओसी देण्याचा कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. अशा प्रकारे, ऑनलाइन प्रणालीद्वारे ओसीसाठी वैयक्तिक प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आणि विद्यापीठाकडून सल्लागार व वास्तुविशारद यांच्याकडून आवश्यक अनुपालनांसह, ओसी देण्याच्या प्रस्तावावर त्याच्या गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील 63 पैकी 38 इमारतीस ओसी नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली होती. या इमारती वर्ष 1975 पासून वर्ष 2017 दरम्यान बांधण्यात आलेल्या आहेत. एकूण 63 इमारतीपैकी फक्त 25 इमारतींना ओसी मिळाली असून 38 इमारतींना ओसी अद्यापपर्यंत मिळाली नाही. एका इमारतीस पार्ट ओसी आहे.

ओसी नसलेल्या इमारतीत हजारों विद्यार्थी आणि विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची ये-जा असून मंजूर आराखडा प्रमाणे काम झाले नसून एफएसआय उपलब्ध असल्यामुळे सुधारित आराखडा सादर करण्याची आवश्यकता आहे. ऑटोडीसीआर ऑनलाईन प्रणाली मार्फत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास ओसी मिळवली जाऊ शकते. आता तर कुलगुरु हेच लक्ष देत नसल्याने त्यांच्यावर कुलपती आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी कारवाई करण्याची मागणी अनिल गलगली यांची आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments