मुंबईची एक अशी मिल, जिला आग लागली; पण अजूनही त्याचं गुढ कायम आहे…
मुंबईत तुम्हाला एखाद दुसरी मिल पाहायला मिळेल, मात्र याच मुंबईमध्ये शेकडो मिल्स होत्या, ज्यांच्या जिवावर मुंबईकर आयुष्य काढत असत.

Mumbai Mukesh Mills : मुकेश मिल्स हे नाव तुम्ही आधी कधीच ऐकलं नसेल, तसं हे नाव ऐकण्याचा काही संबंधच आला नसेल, पण याच मिलबद्दल तुम्हा मुंबईकरांना जाणून घेणं गरजेचं आहे. ही जागा मुंबईत सर्वांच्याच परिचयाची आहे. कुलाबा परिसर तुम्हाला माहिती असेलच, अगदी तिथेच मुकेश मिल आहे, जी आता भग्न अवस्थेत दिसेल. पूर्वी हीच मिल मुकेश टेक्स्टाईल मिल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जात असे.
या मिलची स्थापना ईस्ट आफ्रिकन हार्डवेअर लिमिटेडचे मालक मुळजीभाई माधवानी यांनी केल्याचं काही जुने लोक सांगतात, कारण त्यांच्याच काळात या मिलला अच्छे दिन आले होते. 1870 च्या दशकात ही मिल बांधली गेल्याचं अनेकजण सांगतात. पण त्यावेळी इंग्रजांचं वास्तव मुंबईत असल्याने इंग्रजांनीच ही मिल बांधली, असा काहींचा दावा आहे. असो, तो इतिहासाचा भाग आहे, आपण याच्या पुढे जाऊ.
त्याकाळी दक्षिण मुंबईतील ही एकमेव मिल होती. त्यावेळी गिरणीची स्वतःची खाजगी गोदी होती, तिथे कापूस आणि तयार कापडाची साठवणू केली जात असे. नंतर ती अनेक देशांमध्ये निर्यात केली गेली. काहींचे म्हणणे आहे की ही मिल इंग्रजांनी उभारली होती आणि मुळजीभाई माधवानी यांना चालवाला दिली होती, मात्र अद्याप याचे सत्य तितकंस समोर न आल्याने या मिलचा खरा मालक कोण, हे गूढ समजलं जातं.
1975 मध्ये या गिरणीचे नुतनीकरण करण्यात आले, परंतु काही वर्षांनी ती बंद पडली. गिरणी संपाच्या एका वर्षानंतर गिरणी मालकांनी गिरणी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि अधिकृत बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला, परंतु काही कारणास्तव सरकारने या प्रस्तावास नकार दिला. नंतर 1982 मध्ये गिरणीला आग लागली. ही आग कोणी लावली, कशाने लागली यासोबतच अनेक प्रश्नांची उत्तरे अजून कोणालाच मिळाली नाहीत. संपाच्या काळातच या मिलला आग लागल्याने अनेकजण त्या आगीवरही संशय घेत आहे. या आगीचे कारण आज ही सर्वांसाठी एक गुढ आहे. आग आणि गिरणी संपानंतर मिल कायमची बंद झाली.
मुकेश मिल्सची 10 एकर मालमत्ता आता विकास अग्रवाल (अग्रवाल कुटुंब) यांच्या मालकीची आहे. या गिरणीला व्यावसायिक जागा बनवण्याचा विचार त्यांनी केला आणि गिरणी निवासी जागा किंवा व्यावसायिक जागा बनवण्यासाठी काही योजनाही सादर केल्या, मात्र संरक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही जमीन नौदलाची आहे, त्यामुळे हा प्रकल्प थांबवण्यात आला आणि मिलचा वापर आता बॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शुटींगसाठी केला जाऊ लागला.
वॉन्टेड चित्रपटाचा एक सीनही मुकेश मिल्स येथे शूट करण्यात आलाय. तसेच टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननचा पहिला चित्रपट, हिरोपंतीमधील गाणेही याच मुकेश मिल्सवर चित्रीत करण्यात आले आहे. लुका छुपी (कार्तिक आर्यन आणि क्रिती सनोन) चित्रपटातील ‘पोस्टर लगवा दो’ गाणे देखील मुकेश मिल्स येथे चित्रीत करण्यात आलं आहे.