नारायण राणेंच्या भेटीनंतर काही क्षणात आनंद दिंघेंचा मृत्यू झाला…
25 ऑगस्ट 2001 रोजीची सकाळची वेळ होती. वंदना टॉकिजजवळ दिघेंची जीप आली, ते गणपतीचे दिवस होते. अशी माहिती आहे की ते टेंभी नाक्याकडे जात होते.

Narayan Rane Meet Anand Dighe : धर्मवीर, ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे अशी ज्यांना उपमा दिली गेली, त्या आनंद दिघे यांच्याबद्दल मुंबईतल्या जुन्याजानत्या माणसांना अनेक गोष्टी माहिती आहेत. आनंद दिघे यांचं राहणीमान, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचं राजकारण, त्यांचे कार्यकर्ते, आनंद दिघे आणि ठाकरे घराण्याशी असलेले संबंध, असं सगळं काही सगळ्यांना माहिती आहे. बरं इतकंच नाही, तर आनंद दिघे यांचा शेवटचा प्रवासही अनेकजण सांगताना दिसतात.
25 ऑगस्ट 2001 रोजीची सकाळची वेळ होती. वंदना टॉकिजजवळ दिघेंची जीप आली, ते गणपतीचे दिवस होते. अशी माहिती आहे की ते टेंभी नाक्याकडे जात होते. वंदना टॉकिजजवळील एसटी आगारातून बाहेर पडणाऱ्या बसवर दिघे यांची जीप आदळली. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली. दुखापतीच्या कारणामुळे दिघे त्यांना जवळच्याच सिंघानिया रुग्णालयात नेण्यात आलं.
दिघे साहेबांचा अपघात झालाय आणि त्यांना सिंघानिया रुग्णालयात दाखल केलंय, ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली, नक्कीच ती बातमी मातोश्रीवरही पोहचली होती. म्हणून शिवसेनेतील दिग्गज नेते दिघे यांची भेट घेण्यासाठी सिंघानिया रुग्णालय गाठू लागले. आता दिघे यांची भेट घेणाऱ्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचंही नाव होतंच.
आनंद दिघे जितके बाळासाहेबांना माणायचे तितकेच राज ठाकरेही आनंद दिघे यांना माणायचे. त्यामुळे आनंद दिघे जाण्याचा जितका धक्का बाळासाहेब ठाकरे यांना बसला, तितकाच तो राज ठाकरे आणि सेनेतील इतर नेत्यांनाही बसला. आता 25 ऑगस्टला दिघे यांच्या रुग्णालयाजवळ जमलेल्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं की दिघे साहेबांची तब्येत बरी आहे. अनेकांना तर घरी जाण्याचं आवाहनही केलं होतं, मात्र दिघे यांचे कार्यकर्ते रुग्णालयासमोर थांबले होते.
आता दिवस उजाडला 26 ऑगस्टचा. असं म्हणतात की दिघे यांच्या तब्येतीची प्रत्येक अपडेट मातोश्रीपर्यंत क्षणाक्षणाला पोहचवली जायची, पण याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला दिघे यांची तब्येत बिघडली. याचदरम्यान नारायण राणेही त्यांच्या भेटीला तिथे आले होते. नारायण राणेंनी आनंद दिघे यांची भेट घेतली आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना फोन केला.
आता तुम्ही म्हणाल की ही माहिती तुम्हाला कशी मिळाली, तर त्याचं असं आहे की, नारायण राणे यांनी 19 फेब्रुवारी 2019 रोजी साम टीव्ही मराठीला मुलाखत दिली. त्यावेळेचे संपादक निलेश खरे यांनी ही मुलाखत घेतली होती. त्यामुळे नारायण राणे हे त्या मुलाखतीत काय म्हणाले, हेच आपण जसंच्या तसं पाहू.
दिघे यांचा मृत्यू कोणी मारून झालेला नाही. कारण दिघेंना त्यावेळेला शेवटचा भेटणारा मी होतो. मी तिथून निघाल्यांतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेलेला होता. मी ज्यावेळेला गेलो होतो, तेव्हा त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि डॉक्टर फार प्रयत्न करत होते. मी बाहेर येऊन बाळासाहेबांना फोन केला आणि साहेबांना सांगितलं, साहेब काहीही करा, नितू मानकेला इकडे पाठवा. नितू मानके जर आले तर काही करु शकतील, हे मी बाहेर येताच साहेबांना सांगितलं, साहेबांनी नितू मानकेंना सांगितलं, मानके माझ्याशी बोलले, पण मला वाटतं, नितू मानके यायच्या आगोदर दिघे गेलेले होते. या गोष्टी वास्तव आहेत. हे सगळं नारायण राणे यांनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं.
आनंद दिघे यांचा मृत्यू 26 ऑगस्ट 2001 रोजी संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान झाला. मात्र अधिकृत घोषणा व्हायला दोन तास लागले. आताचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आताचे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीच या गोष्टीची घोषणा केली. त्यानंतर त्या रुग्णालयाचं काय झालं, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेतच. या पुढच्या लेखात आपण पाहणार आहोत, की दिघे यांच्या मृत्यूनंतर जळालेल्या सिंगानिया रुग्णालयाचं पुन्हा नुतनिकरण का झालं नाही?