राजकारण

रिप्लाय द्यायचा होता भाजपला, पण राज ठाकरेंनी भावावर राग काढला…

राज ठाकरे यांचे विश्वासू नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे सध्या अज्ञातवासात असल्याचं म्हटलं जातंय

Raj Thackeray Letter : तुम्ही कुठल्याही प्रकारे कन्फ्यूज होऊ नये म्हणून सरळ सरळ हा लेख मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून म्हणजे 2022 च्या गुढी पाडव्यापासून राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवलाय. सगळ्याच मशिदीवरील भोंगे उतरले पाहिजे किंवा त्यांचे आवाज कमी झाले पाहिजेत, ही मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. इथून त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्दालाही सुरुवात होते, हेही महत्त्वाचं.

गुढी पाडव्याच्या सभेवर टीका झाली म्हणून त्या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी पुन्हा एक सभा घेतली ठाण्यामध्ये. गुढीपाडव्याच्या फक्त 10 दिवसांनंतरच, म्हणजेच 12 एप्रिल 2022 रोजी ती सभा झाली. आता या सभेनंतरही राज ठाकरे यांनी औरंगाबादेत अजून एक सभा घेतली. ती म्हणजे 01 मे रोजी. या सभेनंतर महाआरतीची घोषणा झाली आणि 04 मेला ज्या मशिदीवर भोंगे वाजतील, त्या मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा निर्धार मनसेने घेतला. हा वादंग सुरु झाला आणि मनसेच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस कामाला लागले. त्यातलेच एक म्हणजे संदीप देशपांडे. पण संदीप देशपांडे पोलिसांना न सापडता फरार झाले.

आता या सगळ्या 3 सभांमध्ये राष्ट्रवादी पक्षातील नेते, शरद पवार, मशिदीवरील भोंगे, छत्रपती शिवाजी महाराज या मुद्यांवर राज ठाकरे यांचा रोख होता. यातून हिंदुत्वाचा मुद्दा जन्माला आला, तो भाग वेगळाच. हाच मुद्दा घेऊन येत्या 5 जून रोजी राज ठाकरे उत्तर प्रदेशमधल्या अयोध्याला भेट देणार आहेत. याच दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील केसरगंज मतदार संघातील भाजप पक्षाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी विरोध केलाय.

तुमच्या माहितीसाठी म्हणून…

राज ठाकरे यांची मनसे जेव्हा जन्माला आली, तेव्हा त्यांनी मुंबईतील मराठी माणसांचा मुद्दा उचलला होता. उत्तर प्रदेश, बिहारमधून येणाऱ्या अनेक परप्रांतिय नागरिकांवर मनसेकडून आरोप, त्यांना मारहाण झाल्याचं अनेक पत्रकार सांगतात, तसे व्हीडिओ, फोटोही गुगलवर आहेत. तो जुना राग अजूनही अनेक परप्रांतियांच्या मनात आहेच.

आता ज्या बृजभूषण यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केलाय, त्यांचाही हाच मुद्दा आहे की, ज्या परप्रांतियांवर राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेने हल्ला केलाय, त्यांची ठाकरेंनी माफी मागावी, त्यानंतर राज ठाकरेंना आम्ही उत्तर प्रदेशमध्ये येण्याची परवानगी देऊ. आता एक खासदार किती वातावरण तापवू शकतो, ते तुम्हाला नवनीत राणा यांच्यावरून कळलंच असेल. असो.

बृजभूषण आणि राज ठाकरे यांच्यातला मुद्दा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये तापलाय. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अजून एक महिना आहे, मात्र तो आतापासूनच चर्चेचा मुद्दा केला जातोय, पण बृजभूषण यांच्या प्रश्नांना राज ठाकरे किंवा त्यांच्या मनसेतील नेत्यांनीही प्रतिक्रिया देणं टाळलंय. प्रतिक्रिया कोणी, कशावर, कधी द्यावी, हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय, पण कितीही असलं तरी पत्रकारांना त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहेच ना? अशाच अनेकांना राज ठाकरे हे बृजभूषण यांच्या वक्तव्याला प्रतिक्रिया देतील, असं वाटलं होतं, पण झालं ते उलटंच.

राज ठाकरे यांचे विश्वासू नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे सध्या अज्ञातवासात असल्याचं म्हटलं जातंय. त्यांना ताब्यात घेत असताना एका महिला पोलिसाला जखमी केल्याचा आरोप देशपांडेंवर आहे. याच आरोपाखाली अटक करण्यासाठी मुंबई पोलीस त्यांच्या शोधात आहेत, पण राज ठाकरे यांच्या घरासमोरून फरार झालेल्या देशपांडे यांचा शोध अद्याप लागलेला नाही आणि यावरच राज ठाकरे भडकले. एकीकडे बृजभूषण यांना उत्तर देण्यासाठी मनसे खळखट्याक करेल, अशी अनेक समजूतदार नागरिकांची अपेक्षा असताना राज ठाकरे यांनी आधी आपल्या कार्यकर्त्यांसाठी डाव टाकला.

राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल थेट आपला भाऊ उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरुन पत्र लिहलं. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्ताकारणावरुनही काही शब्द सुनावलेच, सोबतच आपल्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्धही आवाज उठवला. अखेर या एका पत्रामुळे रिप्लाय द्यायचा होता भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांना, पण राज ठाकरेंनी भावावर सगळा राग काढला, असं म्हटलं जातंय. त्यामुळे बृजभूषण यांनी केलेल्या अनेक आरोपांना राज ठाकरे कधी उत्तर देणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments