मुंख्यमंत्र्यांनी फोन उचलला नाही आणि संभाजीराजेंचा राजकीय गेम झाला…
आपण गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणूक, पक्षांचे उमेदवार, सहा जागा, त्यावर कुठल्या पक्षाचे किती उमेदवार हे सगळं गणित वाचत आलोय आणि पाहतही आलोय, आता पुन्हा त्या गोष्टी नको. म्हणून सरळ मुद्यापासून सुरुवात करु.

Sambhajiraje Call Uddhav Thackeray : तर राज्यसभेमधील राष्ट्रपती नियुक्त 56 खासदारांचा कार्यकाळ संपला. त्यात महाराष्ट्रातील 6 खासदारांचा समावेश होताच, त्यातील एक खासदार म्हणजे संभाजीराजे छत्रपती. आता खासदारकीचा कार्यकाळ संपला म्हणून ज्यांनी त्यांना खासदारकीसाठी मदत केली होती, त्या देवेंद्र फडणवीसांची 9 मे रोजी भेट घेतली. त्यांचे आभार माणण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर 12 मे रोजी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपण पुन्हा राज्यसभेच्या खासदारकीसाठी अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने उभा राहणार असल्याची घोषणा केली.
यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. संभाजीराजेंच्या या निर्णयामागे भाजपचा हात असल्याचा संशय शिवसेना आणि काँग्रेससह राष्ट्रवादीलाही आला, त्यामुळे शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देण्याचं टाळलं, त्यातच भर म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं ठरवलं. आाता इतकं सगळं झाल्यानंतर प्रकरण सुरु झालं, ते म्हणजे संभाजीराजेंचा शिवसेनेतील पक्षप्रवेश.
संजय राऊत, विनायक राऊत यांनी घोषणाही केली की जर संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत येत असतील तर त्यांना आम्ही उमेदवारी देऊ. आता संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत अपक्ष लढण्याची घोषणा केली आणि त्यानंतर ते शिवसेनेत कसा पक्षप्रवेश करतील, इथे संभाजीराजेंच्या अस्मितेचाही प्रश्न होताच, त्यामुळे संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम होते, तर शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम होती.
आता प्रकरण दुसरं समोर आलं. ते म्हणजे संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट. 19 मे रोजी संभाजीराजेंनी ही भेट घेतली, त्यामध्ये चर्चा फक्त संभाजीराजे यांच्या पाठिंब्याची आणि शिवसेनेतील पक्षप्रवेशाची होती. यामध्ये दोन दिवसांचा विचार करण्याची चर्चा होऊन संभाजीराजे तिथून निघाले. आता मुख्य मुद्दा पुढे आहे.
चर्चा झाल्या, खलबतं झाली, पण निष्कर्ष शून्य होता. कारण 27 मेचा दिवस उजाडला आणि छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री आणि आपल्यामध्ये काय काय बोलणं झालं त्याबद्दल मन मोकळं केलं. संभाजीराजेंची अट होती की शिवसेना पुरस्कृत आणि महाविकास आघाडीच्या वतीने अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा, मात्र याा प्रस्तावालाही मुख्यमंत्री ठाकरेंनी नकार दिला.
दोन दिवसांनंतर शिवसेनेतील मंत्री आणि संभाजीराजेंची ओबेरॉयमध्ये बैठक झाली, मुख्यमंत्र्यांचे मुद्दे आणि संभाजीराजेंच्या अटी यांचा ड्राफ्ट तयार झाला, शिवसेनेचे शिष्टमंडळ आणि संभाजीराजे यांच्या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीमध्ये एक ड्राफ्ट वाचण्यात आला, त्यात काहीशे बदलही करण्यात आले आणि दोघांच्या संमतीने ड्राफ्ट फायनल करण्यात आला. या ड्राफ्टनुसार संभाजीराजे यांची खासदारकी पक्की होण्याची शक्यता होती. त्यामुळे ते आपल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी कोल्हपूरला गेले. तिथे जात असताना मात्र संभाजीराजेंना अनेक बातम्यांमधून वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या.
शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात बोलणं होऊनसुद्धा संभाजीराजे यांना न सांगताच कोल्हापूरच्या संजय पवार यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. ही गोष्ट कळताच संभाजीराजेंनी बैठकीमध्ये असलेल्या खासदार आणि मंत्र्यांना फोन लावला, त्यांनी कुठलंच समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यामुळे संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावला मात्र मुख्यमंत्र्यांनी फोन उचलला नाही, तिथेच राजकारणाचा गेम पलटी झाला आणि संभाजीराजे यांना मिळणारा शिवसेनेचा पाठिंबा नाहीसा झाला. आता पुढे काय, तर संभाजीराजे यांनी खासदारकीच्या निवडणुकीतून माघार घेतली.
एवढं सगळं होऊनदेखील संभाजीराजे निवडणूक लढले असते तर संभाजीराजे यांना आमदारांचा गरजेइतका पाठिंबा मिळाला नसता. संभाजीराजे यांना राज्यसभेचा खासदार होण्यासाठी महाराष्ट्रातील 42 आमदारांचा पाठिंबा मिळणे गरजेचे होते. तसं गणित पाहिलं तर
भाजप – 105
शिवसेना- 56
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम- 02
समाजादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य सक्ती – 01
क्रांतीकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13
अशी संख्या आहे. मात्र या सगळ्यात संभाजीराजे यांना हवा असलेला पाठिंबा यातून मिळत नव्हता, कारण 27 मे रोजी राजेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या शेवटी अपक्ष आमदारांवर दबाव असल्याचं मत संभाजीराजेंनी बोलून दाखवलं. आता हा दबाव कोणाचा, हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.