घटना

मुंबईत कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता किती टक्के? मुंबई पुन्हा बंद होईल का?

मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत. दिवसेंदिवस ती आकडेवारी वाढतेय, यात शंका नाही. तुम्हाला विश्वास बसावा म्हणून महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना संबंधित दिलेल्या आकडेवारीवर एकदा नजर टाकू.

महाराष्ट्रातील मागील काही दिवसांची आकडेवारी समोर आलेल्या रुग्णांची आकडेवारी

13 जून – 1885
12 जून – 2946
11 जून – 2922
10 जून – 3081
09 जून – 2813

ही संपूर्ण महाराष्ट्रातील रोज समोर येणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी होती. त्यातील फक्त मुंबईतील रुग्ण किती आहेत, ते पाहणंही गरजेचं आहे.

13 जून – 1118
12 जून – 1803
11 जून – 1745
10 जून – 1956
09 जून – 1702

तुम्हाला वाटलं तर तुम्ही सारख्याच तारखेची मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहू शकता. तुम्हाला सरळ सरळ फरक दिसून येईल की संपूर्ण महाराष्ट्रातील 50 टक्के किंवा त्याहून अधिक रुग्ण हे फक्त मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रात सापडत आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, हे नक्की.

मुंबईमध्ये आलेल्या कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेबद्दल वेगळं सांगायला नको. हॉस्पिटलची परिस्थिती, रुग्णांची गैरसोय, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक प्रश्नांना तुम्ही सामोरे गेले असाल. हे दु:ख चौथ्या लाटेच्या स्वरुपात परत येणार का, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.

सध्या त्याचं उत्तर कोणीच सांगण्याच्या तयारीत नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेष टोपे यांनीही यावर विधान केलं होतं. त्यांच्या मते अजून महाराष्ट्रात कोरोनामुळे मास्क सक्ती करण्याची गरज नाही, मात्र गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरणे गरजेचे आहे.

आता यावर रवी गोडसे यांनी आपलं मत मांडलं होतं. देशात कोरोनाची चौथी लाट येणार का, हा प्रश्न एका माध्यमाने त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी नकार दिला होता. आता कोरोनाची चौथी लाट येणार नाही. हवं तर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, पण चौथी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे, असं डॉक्टर गोडसे म्हणाले होते.

अनेक गोष्टींचा विचार केला तर मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या जरुर वाढत आहे, मात्र त्या रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांमध्ये कोरोना तिव्रता कमी असल्याचं म्हटलं जातंय. आता अनेक जणांनी कोरोनाचा पहिला, दुसरा आणि बूस्टर डोसही घेतला आहे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होणे किंवा त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं म्हटलं जातंय, त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येणे किंवा त्यामुळे मुंबई बंद होणे, या गोष्टींची अजून तरी शक्यताच वर्तवली जात आहे, ठोस उत्तर कोणीच देत नाहीत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments