
उद्धव हा विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाहीये. देश आणि महाराष्ट्र जेवढा त्यांना ओळखत नाही एवढं मी उद्धव ठाकरे यांना ओळखतो, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत मांडलं. 2014 आणि 2017 साली दोन्ही भाऊ एकत्र येतील असं वाटतं असताना ही चर्चा कुठे फिस्कटली यावर बोलताना राज ठाकरे बोलले.
गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर थेट आरोप करताना दिसत आहेत याची सुरुवात गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेमध्ये झाली होती. पण एकेकाळी अशी वेळ होती की ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल केल्याने राज ठाकरे पक्षाचे शिबिर अर्धवट सोडून मुंबईला पुन्हा रवाना झाले होते.
17 जुलै 2012 रोजी उद्धव ठाकरे यांना छातीत खूप दुखू लागले. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची अँजिओग्राफी केली जाणार होती. त्या दिवशी आपल्या तीन दिवसांच्या पक्षशिबिराच्या निमित्ताने राज ठाकरे यांचा मुक्काम अलीबागला होता. उद्धव यांच्या आजारपणाची बातमी स्वतः बाळासाहेबांनी फोनवरून राज ठाकरेंना दिली होती. राज यांनी ताबडतोब मुंबईला लीलावती रुग्णालयात धाव घेतली. उद्धव ठाकरे आणि त्यांची धावती भेटही झाली. संध्याकाळी जेव्हा उद्धव यांना रुग्णालयातून घरी सोडले, तेव्हा राज स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’मध्ये घेऊन आले. राजनी 2008 नंतर पहिल्यांदाच मातोश्रीमध्ये पाऊल ठेवले. 2008 च्या ‘मातोश्री’ भेटीत राजनी बाळासाहेबांची भेट घेतली होती.
राज – उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर घेऊन जात असल्याची दृश्ये टी.व्ही.वर झळकली आणि दोघांच्या हातमिळवणीच्या वावड्या पुन्हा एकदा जोर पकडू लागल्या. उद्धव यांच्या हृदयाच्या रक्तपुरवठ्यात तीन ठिकाणी अडथळे सापडल्याने त्यांची अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय झाला होता. त्या शस्त्रक्रियेच्या वेळी राज स्वतः त्यांच्यासोबतच होते. परंतु आता राज उद्धव एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.