आपलं शहरबीएमसी

BMC Election 2022 : मुंबई महापालिकेवर मनसे झेंडा फडकवणे शक्य आहे का? राज ठाकरेंची तर ब्लू प्रिंट तयार!

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी राजकारणात नवा पत्ता टाकणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेची लवकरच निवडणूक (BMC Election 2022) जाहीर होईल. सध्याची राजकारणाची स्थिती पाहता सर्वच पक्ष महापालिकेवर आपला झेंडा रोऊ इच्छित आहेत, त्यानुसार हालचालींना देखील वेग आलाय. मात्र, राजकारणाच्या स्पर्धेत पारड हलकं असणारी मनसे महापालिका निवडणूक जिंकली तर काय करणार? काय असेल मनसेची ब्ल्यू प्रिंट? यावर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलंय.

नुकतीच राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. अनेक राजकीय बाजूंचा उलगडा यात राज ठाकरे यांनी मुलाखतीत केला. यावेळी त्यांनी महापालिकेवर सत्ता आल्यास मनसे काय करेल, यावर भाष्य केलं. पण सत्यता पाहता हे खरंच शक्य आहे का? मनसेची सत्ता महापालिकेवर येऊ शकते का? यावर काही गोष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.

मनसेची सत्ता महापालिकेवर येणं शक्य आहे का?

मविआच्या 2021 च्या मंत्रिमंडळात मुंबई महापालिकेचे 227 वरून 236 इतके वार्ड करण्यात आले. मुंबई परिसरात लोकसंख्येची झालेली वाढ पाहता हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये बहुमत प्राप्त करणाऱ्या पक्षाची म्हणजेच ज्या पक्षाचे अर्ध्याहून जास्त (118+) नगरसेवक त्याच पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकणार. 2017 साली मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रभाग क्रमांक 166 मधील नगरसेवक संजय तुर्डे यांनी मनसेसोबतच राहण्याचा निर्णय घेतलेला. त्यामुळे सध्या मनसेकडे एकच माजी नगरसेवक आहे. मनसेला 118+ चा आकडा गाठण्यासाठी चांगलीच कंबर कसण्याची गरज आहे.

मुंबई महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला 84 जागा, भाजपला 82 जागा, कॉंग्रेसला 31 जागा, राष्ट्रवादी कॉंग्रेसला 9 जागा तर मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या. सध्याची शिंदे गट आणि शिवसेनेचा अंतर्गत वाद पाहिला तर याचा फायदा इतर पक्षांना होण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील अनेक नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

सध्या सुरू असलेल्या राजकारणात मनसे बाजी मारेल असा तर्कवितर्क अनेकजण लावत आहेत. राज ठाकरेंची गुढीपाडव्यापासून झालेल्या सभा पाहता अनेक सभांना लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कोरोना काळात अनेक लोक कृष्णकुंज दरवाजा ठोठावत राज ठाकरेंकडे मदतीसाठी डोळे लावून बसले होते. तसेच चर्चेतील भोंग्याचा विषय मार्गी लागल्याने मनसेकडे लोकांचा कल जाण्याची दाट शक्यता आहे, परंतु किती नगरसेवक निवडून येतील याबाबत पक्का आकडा सांगता येणार नाही.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी राजकारणात नवा पत्ता टाकणार?

एकीकडे शिवसेना शिंदे गट वाद सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. राजकारणापलीकडे फडणवीस राज ठाकरेंची दोस्ती सर्वश्रुत आहे. त्यामुळे ही दोस्ती पालिका निवडणुकीत दिसली तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. ठाकरेंचा ब्रँड चेहरा म्हणून राज ठाकरे आणि भाजप एकत्र पालिका निवडणूक लढली तर शिवसेनेला चांगलाच धक्का बसण्याची शक्यता आहे.

मनसेची मुंबई महापालिकेवर सत्ता आली तर…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास तुम्ही काय कराल, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारता त्यांनी फार चतुराईने एका वाक्यात याचे उत्तर मुलाखतीत दिले. “जे तुम्ही मुंबईत पाहिले नाही, ते मी तुम्हाला करून दाखवू शकतो”, त्या कोणत्या गोष्टी असतील त्या माझ्या जाहीरनाम्यात येतील, असे त्यावेळी राज ठाकरे म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments