राजकारण

ना एकनाथ शिंदेंची, ना उद्धव ठाकरेंची; मुंबई पालिका भाजपची?

55 पैकी उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 06 आमदार सोबतीला आहेत, तर 18 पैकी 12 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.

BMC Election 2022 : अख्ख्या जगातील अनेक लोकांना ही गोष्ट माहिती आहे की एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाविरोधात बंड केलंय. शिवसेनेतील ३९ हून अधिक आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झालेत. म्हणजे 55 पैकी उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 06 आमदार सोबतीला आहेत, तर 18 पैकी 12 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आता आजच्या विषयातला हा आपला मुद्दा नाही, मात्र माहिती असावी म्हणून तुम्हाला सांगणं, हे आमचं कर्तव्य आहे. आजचा मुद्दा हा आहे की मुंबई पालिका कोणाची.

आता इथे फक्त एकट्या मुंबई पालिकेचं चित्र पाहून चालणार नाही, तर सोबतीला असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या पालिकांचं गणित समजून घेणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे राज्यात ज्या महापालिकांची चर्चा सुरु आहे, त्या सगळ्या पालिकांचा कार्यकाळ संपलाय, तिथे प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी काम करत आहेत. म्हणजेच आता कोणीही नगरसेवक नाही, कोणीही महापौर नाही. असं असलं तरी जे काही दिवसांपूर्वी नगरसेवक होते, त्यांनी एकनाथ शिंदे गटाला आपलंसं केलंय.

ठाणे महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, मीरा-भाईंदर महानगर पालिका, उल्हासनगर महापालिका, पनवेल महानगर पालिका या मुंबई पट्ट्यातील महापालिकांची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. यातल्या ठाणे आणि मुंबई पालिकेत गेल्या कित्येक वर्षे शिवसेनेचं वर्चस्व आहे. मुंबई पालिकेत उद्धव ठाकरे यांच्या गटाचं वर्चस्व आहे तर ठाणे पालिकेत एकनाथ शिंदे गटाचं वर्चस्व आहे.

या दोन्ही पालिकेतील होऊन गेलेले किंवा निवडून येऊ शकतात अशा नगरसेवकांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. तसं पाहिलं गेलं तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या पालिकेतील माजी नगरसेवकांनी (काही दिवसांपूर्वीच या नगरसेवकांचा कार्यकाळ संपलाय, असे) एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवलाय. यातील असे अनेक नगरसेवक आहेत, जे पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे. या गटाला मुंबई पालिका अपवाद आहे. कारण मुंबई पालिकेतील आताच कार्यकाळ संपलेल्यांपैकी शीतल म्हात्रे सोडल्या, तर अजून कोणत्याच नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शवला नाही. शीतल म्हात्रेंनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शवलाय)

आता यात भाजपचा रोल समजून घ्या. मुंबई महानगर पालिकेत सत्ता आणण्याची जबाबदारी भाजपकडून आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या नेत्यांवर सोपवली आहे. आशिष शेलारांनी आधीच क्लिअर केलंय की येणाऱ्या निवडणुकीत मुंबई पालिकेवर भाजप झेंडा फडकवणार. आता याच भाजपला शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाची साथ मिळाली आहे. यामुळे भाजपची अजून पॉवर वाढलेली दिसून येते.

मुंबई पालिकेत भाजपची तर ठाणे पालिकेत शिंदे गटाची सत्ता निर्माण करु, अशा प्रकारचा करार एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये होण्याची शक्यता आहे. या सगळ्यावरुन निष्कर्ष काढायचा झाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भांडणात भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जरी मुंबई पालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व असलं तरी येणाऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या मदतीने भाजप मुंबई पालिकेवर सत्ता करु शकते, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments