आपलं शहरबीएमसी

Mumbai Mahapalika History : ब्रिटिशांच्या ताब्यात असणाऱ्या मुंबईत BMC ने कसा जन्म घेतला? वाचा संपूर्ण इतिहास

लोकसंख्येच्या वाढीमुळे समस्या हाताळण्यासाठी नगरपालिकेसारख्या संस्थेची गरज भासू लागली. मुंबई महापालिका बनण्यासाठी हे पहिलं पाऊल पडलं.

मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आल्याने सध्या स्थानिक पातळीवरुन देश पातळीवर मुंबई महापालिका (Mumbai Mahapalika History) पालिका हा चर्चेचा विषय आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. सध्या चर्चेत असणारी हीच मुंबई महापालिका स्थापन कशी झाली? (BMC History) काय आहे मुंबई महापालिकेमागचा इतिहास? याच सगळ्या गोष्टी, मुंबई महापालिकेचा अचूक इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत.

मुंबई महापालिका बनण्यासाठी पहिलं पाऊल

भव्य इमारत, अर्थव्यवस्था सुदृढ आणि करोडो मुंबईकरांची काळजी घेणारी पालिका 1889 रोजी स्थापित झाली, हे अनेकांना माहीत असेल. मात्र सुमारे दीडशे वर्षांपूर्वी मुंबईत म्युनिसिपल यंत्रणाच अस्तित्वात नव्हती , हे कुणाला सांगून देखील खरे वाटणार नाही. ईस्ट इंडिया कंपनीने सन 1668 मध्ये मुंबई आपल्या ताब्यात घेतल्यापासून जवळजवळ दोनशे वर्षे मुंबईचा सर्व कारभार ब्रिटिश गव्हर्नर आणि त्याचा सचिव यांच्यामार्फत चालवला गेला. लोकसंख्येच्या वाढीबरोबर कायदा आणि सुव्यवस्था त्याचप्रमाणे जनतेच्या आरोग्याचे प्रश्न वाढू लागले, आणि ह्या समस्या हाताळण्यासाठी नगरपालिकेसारख्या संस्थेची गरज भासू लागली. मुंबई महापालिका बनण्यासाठी हे पहिलं पाऊल पडलं. ‘ऐक मुंबई तुझी कहाणी’ या पुस्तकात मुंबई महापालिकेचा इतिहास सांगितला आहे.

मुंबईच्या कारभारात सुसूत्रता

1792 साली तत्कालीन गव्हर्नर जनरलने नागरी प्रश्न, घरपट्टी आणि उत्पन्न वाढवणाऱ्या इतर योजना हाताळण्यासाठी ‘जस्टिस ऑफ पीस’ हे पद तयार केले.सुरुवातीच्या काळात शहराच्या कारभारातील पोलिस खाते आणि नागरी प्रश्न ही दोन्ही खाती एकत्र होती, पण सन 1812 साली कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी मॅजिस्ट्रेटच्या हाताखाली पोलिस यंत्रणा वेगळी करण्यात आली. 1845 साली नागरी उत्पन्नाचा योग्य प्रकारे विनिमय करण्यासाठी ‘म्युनिसिपल कौशपेंदिव बोर्ड’ नावाच्या एका मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुंबईच्या स्थानिक कारभारात थोडी सुसूत्रता येण्यास सुरुवात झाली.

शहर-विकासाच्या स्वच्छ पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, मलनिःसारण या गोष्टींसाठी अतिशय कार्यक्षम अशा स्वतंत्र कारभाराची जरुरी होती. तेव्हा शहराच्या एकंदर कारभाराविषयी भाऊ दाजी लाड आणि ताना शंकरशेठ यांनी सुरू केलेल्या टीकेची योग्य दखल घेऊन सरकारने ‘म्युनिसिपल ॲक्ट 1865’ हा कायदा अस्तित्वात आणला. ह्यामुळे जस्टिस ऑफ पीसकडे आर्थिक जबाबदारी ठेवून नगरपालिकेचे बाकीचे सर्व अधिकार आयुक्तांकडे देण्यात आले.

…अशी बनली मुंबई महापालिका!

सर ऑर्थर कॉफर्ड हा पहिला आयुक्त मुंबईला मिळालेल्या एकूण आयुक्तांमध्ये सर्वांत कार्यक्षम आयुक्त म्हणून त्यांची ओळख होती. याच सुमारास नगरपालिकेच्या कारभारात नागरिकांचे देखील प्रतिनिधित्व असावे, अशी मागणी सुरू झाली. ह्या मागणीसाठी सरकारकडे सातत्याने प्रयत्न करण्यात सर फिरोजशहा मेहता, बदुद्दीन तय्यबजी के टी तेलंग इत्यादी व्यक्तींनी विशेष हातभार लावला. 1872 चा नवा म्युनिसिपल ॲक्ट अस्तित्वात आला. त्यात मुंबईच्या करदात्यांना आणि विश्वविद्यालयाच्या सभासदांना 32 सभासद निवडण्याचा हक्क देण्यात आला. 16 सभासद जे. पी. निवडत असत आणि 16 प्रतिनिधींची नेमणूक सरकारमार्फत होत असे. अशा तऱ्हेने 64 प्रतिनिधींची मुंबई महापालिका त्यावेळी अस्तित्वात आली .

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments