राजकारण

2009 मध्येच राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार होती, पण बाळासाहेबांमुळे रखडलं…

राष्ट्रवादी या पक्षाचं आतापर्यंत कोणासोबत वावडं नाही. राष्ट्रवादीने काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेसोबतही सत्ता स्थापन केली होती.

Balasaheb Thackeray : 2019 मध्ये कधी नव्हे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र सत्तेत आले. त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी हा पक्षही मध्यस्थिला होता. राष्ट्रवादी या पक्षाचं आतापर्यंत कोणासोबत वावडं नव्हतं. कारण गेली अनेक वर्षे काँग्रेस हा पक्ष राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करुन सत्ता स्थापन करतोय, 2019 मध्ये भाजपनेही राष्ट्रवादीसोबत काही तासांचं सरकार स्थापन केलं होतं, तर त्याच 2019 मध्ये शिवसेनेने पुढाकार घेत काँग्रेसला सोबत घेत राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं होतं. 29 नोव्हेंबर 2019 रोजी ठाकरे सरकार स्थापन झालं होतं, मात्र 29 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता या सगळ्या पार्श्वभूमिचा मोड हा 2009 शी जोडणं गरजेचं आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकांची वेळ होती. यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येणार होते. दोन्ही पक्षांचे दौरे सुरु झाले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची सभा शिरुर मतदार संघात होणार होती. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी या मतदार संघातून निवडणूक लढण्याची तयारी केली होती. बाळासाहेब ठाकरे हे सभेला उपस्थित राहणार होते.

आता या सगळ्यात संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये युतीची चर्चा होत होती. त्यामुळे आढळराव पाटलांना सभा रद्द करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा आढळरावांनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. शिरुर हा मतदार संघ शरद पवारांना लढण्यास द्यावा आणि आढळरावांनी मावळ मतदार संघातून निवडणुक लढवावी असा प्रस्ताव आढळरावांसमोर ठेवण्यात आला, मात्र आढळरावांनी त्याला विरोध केला. ही गोष्ट बाळासाहेबांच्या कानावर टाकली. तेव्हा बाळासाहेबांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा मुद्दा बाजूला करुन शिरुर हा मतदार संघ शिवाजीराव आढळरावांसाठी राखीव ठेवला आणि सुनियोजित सभाही संपन्न झाली.

तसं पाहिलं तर बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणूक लढली होती, त्यामुळे शरद पवारांनी शिरुर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवावी आणि पुढे पंतप्रधान पदासाठी त्यांचा विचार केला जाईल, असं नियोजन ठरलं होतं. मात्र बाळासाहेबांच्या एका आदेशाने हा प्रस्ताव धुडकावल्याची माहिती समोर येतेय.

आता ही माहिती आम्ही नाही, तर खुद्द शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 19 जुलै 2022 रोजी जुन्नरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादाच्या आधी शिवाजीरावांची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments