राजकारण

खासदार, आमदारांना गोळा केलं, पण शिंदे एका पेचात फसले…

जेव्हा घटनेचा विचार केला जातो, तेव्हा शिवसेनेच्या पाच मुद्दांचा विचार हा करावाच लागतो. घटनात्मक रचना, राष्ट्रीय कार्यकारणी, पक्षप्रमुख, पक्षप्रमुखांचा अधिकार आणि प्रतिनिधी सभा.

Eknath Shinde Group : एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षप्रमुखाविरोधात बंड केलंय, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको, जर त्या बंडाचं सगळं गणित तुम्हाला वाचायचं असेल तर इथं क्लिक करा. आपण थोडं पुढं जाऊ. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर सगळ्यात आधी एक महत्त्वाचं काम केलं. शिवसेनेतील सर्वाधिक आमदारांना आपल्या बाजूने केलं. तिथेच ते थांबले नाहीत, त्याच्याही पुढे जाऊन लोकसभेत निवडणूक आलेल्या खासदारांनीही आपल्या बाजूने घेरलं. पण फक्त इतकं करुन एकनाथ शिंदेंकडे संपूर्ण पक्ष येणार नाही, त्यासाठी त्यांना अजून एक मोठं काम करावं लागणार आहे, जे त्यांना वाटतं, तितकं सोप्प नसणार आहे.

इतर पक्षांप्रमाणे शिवसेनेकडे घटना नावाचा प्रकार आहे. त्या घटनेमध्ये पक्ष कसा चालणार, पक्षप्रमुख कोण असणार, कार्यकारणी कोणाची असणार असं सगळं ठरलेलं असतं. शिवसेनेत विधीमंडळ पक्ष आणि संघटनात्मक पक्ष असे दोन प्रकार आहेत. त्यात विधीमंडळ पक्षाचा विचार केला तर बहुमत एकनाथ शिंदेंच्या बाजूने आहे आणि संघटनात्मक पक्षाचा विचार केला तर बहुमत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे.

जेव्हा घटनेचा विचार केला जातो, तेव्हा शिवसेनेच्या पाच मुद्दांचा विचार हा करावाच लागतो. घटनात्मक रचना, राष्ट्रीय कार्यकारणी, पक्षप्रमुख, पक्षप्रमुखांचा अधिकार आणि प्रतिनिधी सभा.

1976 मध्ये शिवसेना पक्षाची घटना स्थापन करण्यात आली. 1988 मध्ये पक्षाचं चिन्ह वाघ तर निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असल्याचं निश्चित झालं. घटनेनुसार शिवसेना प्रमुख हे पद कायमस्वरुपी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होतं आणि आताही त्या पदावर कोणीही दावा करु शकत नाही. त्यानंतर तब्बल १० पदं ही शिवसेनेत महत्त्वाची आहेत. ती म्हणजे पक्षप्रमुख, नेते, उपनेते, संंघटक, समन्वयक, विभागप्रमुख, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख. ही शिवसेनेची संघटना आहे. फक्त विधीमंडळ नाही, तर कायद्यामध्ये एकनाथ शिंदे यांना पक्क व्हायचं असेल तर या 10 मुद्द्यांना आपल्याकडे ओढावं लागेल.

शिवसेनेची घटना इतकीच सांगते की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे सगळे अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जातात. संघटनेतून कोणाला काढायचं आणि कोणाला ठेवायचं याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत आणि उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड ही शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी करते.

एकनाथ शिंदे यांनी आमदार खासदारांना वळवल्यानंतर एक महत्त्वाचं काम केलं, ते म्हणजे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली. शिंदेंनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी तयार केली, त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेते म्हणून निवड केली. जरी शिंदेंकडे मुख्यनेते पद असलं तरी पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत, हेही तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे खासदार, आमदारांना जरी एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे वळवलं तरी एकनाथ शिंदे हे अजूनही शिवसेनेच्या घटनेच्या पेचात अडकल्याचं सिद्ध झालंय.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments