Smita Thackeray : स्मिता ठाकरेंसाठी बाळासाहेबांनी जे केलं नाही ते शिंदे करणार? भेटीत काय घडलं?
स्मिता ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची काही काळ चर्चेत असणारी उत्तराधिकारी!

राजकारण सध्या रोज जोर के झटके धिरेसे लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पारड दिवसेंदिवस जड होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे अनेक नेते, कार्यकर्ते शिंदे गटाला जाहीर पाठिंबा देताना दिसतायेत. शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या संख्येच्या बातम्यांचा रस कमी होतोच की नवीन नाव समोर आलं आणि शिंदे गटाला भेटीची बातमी ब्रेकिंग न्यूज बनली. मुख्यमंत्र्यांना भेट देणाऱ्या चेहऱ्याचं नाव होत स्मिता ठाकरे (Smita Thackeray). पाहायला गेलं तर ठाकरे घराण्याची सून, उद्धव ठाकरे यांची वहिनी आणि बाळासाहेब ठाकरे यांची काही काळ चर्चेत असणारी उत्तराधिकारी!
स्मिता ठाकरे 1990 च्या काळात उद्धव ठाकरे, राज ठाकरेंइतक्याच चर्चेत होत्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मिता ठाकरे यांनी सदिच्छा भेट घेतल्याचं सांगितलं. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आणि स्मिता ठाकरेंचा राज्यसभेत जाण्याचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने समोर आला. ‘बाळ ठाकरे अँड द राईज ऑफ द शिवसेना’ या पुस्तकात स्मिता ठाकरे यांचा राजकीय कारकीर्दीचा उल्लेख करण्यात आला आहे. स्मिता ठाकरे काहीकाळ राजकीय क्षेत्रात सक्रिय होत्या.
कोण आहेत स्मिता ठाकरे?
ठाकरेंच्या सूनबाई ठाकरे सरकार पडणाऱ्या व्यक्तीच्या भेटीला जातात, तेव्हा त्या प्रसंगाची चर्चा होते. स्मिता ठाकरे नेमक्या कोण (Smita Thackeray History) आहेत, पाहुयात. स्मिता ठाकरेंची खरी ओळख म्हणजे स्मिता चित्रे. रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या स्मिता ठाकरे यांचा 1987 साली बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांच्यासोबत विवाह झाला. स्मिता ठाकरे जयदेव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या स्मिता ठाकरे ठाकरेंची सूनबाई झाल्यानंतर राजकारणात उडी घेतात. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्घाटन कार्यक्रम असो की राजकीय सभा, स्मिता ठाकरे नेहमी सक्रिय दिसल्या. 1999 मध्ये ‘हसिना मान जाये’पासून त्यांनी राहुल प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सिनेनिर्मितीत पाऊल ठेवलं आणि त्यांचं बॉलिवूडचं करिअर तेव्हापासून सुरू झालं. 1999 नंतर स्मिता ठाकरे राजकारणात सक्रिय दिसल्या नाही मात्र त्यांनी ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांसाठी, तसंच एड्सबाबत जनजागृती म्हणून मुक्ती फाऊंडेशन चालविले.
स्मिता ठाकरे आणि राज्यसभा तिकिटाचा किस्सा
राजकारणात सक्रिय झालेल्या स्मिता ठाकरेंना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती. मात्र त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. यामागे कारण होते बाळासाहेब ठाकरे, असा खुलासा खुद्द स्मिता यांनी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. “बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की राज्यसभेत पाठवू. मात्र त्यांनी मला राज्यसभेत पाठवलं नाही. यामागचे कारण मला माहित नाही, पण राज्यसभेच्या व्यासपीठावरून मी माझे मुद्दे नीट मांडू शकले असते, असं मला वाटतं”, असं स्मिता ठाकरेंनी मुलाखती दरम्यान म्हंटल होतं.
राज्यात सध्या शिंदे-फडणवीस यांचा सरकार आहे. नुकत्याच राज्यसभा निवडणुका पार पडल्या आणि त्यात भाजपला चांगला यश मिळालं. पुढील काही महिने राज्यसभेतील जागांसाठी निवडणूक होणार नसली तरी येत्या काळात राष्ट्रपती नियुक्त खासदारांची वर्णी लागू शकते. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असल्यानं एकनाथ शिंदेंमार्फत भाजपशी जवळीक वाढवून राष्ट्रपती नियुक्त 12 खासदारांच्या यादीत स्मिता ठाकरे नाव मिळवू शकतात. 12 खासदारांच्या यादीत स्थान मिळाले तर स्मिता ठाकरेंची राज्यसभेत जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.