ठाण्यात ठाकरेंच्या मदतीला दिघे का धावून आले? शिवसेनेला फायदा काय?
केदार दिघेंनी आनंद दिघे यांना मुखाग्नी दिला होता. त्यामुळे ठाण्यात केदार दिघे यांचं खूप महत्त्व आहे.

Kedar Dighe : आता शिवसेना कोणाची, बाळासाहेब कोणाचे, आनंद दिघे कोणाचे, या वादात आम्ही जात नाही, कारण शिवसेनेत सध्या दोन गट आहेत आणि दोन्ही गटाकडून शिवसेना आमची, बाळासाहेब आमचे, आनंद दिघे आमचे, असा दावा केला जातोय, असो. हा राजकारणाचा भाग असला तरी मात्र आज आम्ही ठाकरेंच्या मदतीला दिघे का धावून आलेत, हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आनंद दिघे यांच्यानंतर दिघे घराण्यामध्ये केदार दिघे यांचं नाव जोडलं जातं. याच केदार दिघेंनी आनंद दिघे यांना मुखाग्नी दिला होता. त्यामुळे ठाण्यात केदार दिघे यांचं खूप महत्त्व आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षामध्ये बंड केलं, त्यानंतर प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे केदार दिघे कोणाच्या बाजूने जाणार? दिघे कुटुंबियांना एकनाथ शिंदे आपल्याकडे वळवणार का? असे अनेक सवाल समोर येऊ लागले, मात्र त्या सगळ्यात एक गोष्ट अशी घडली की ज्यामुळे अनेक प्रश्नांना आपोआप उत्तरे मिळालं.
जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, तेव्हा केदार शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतेली. त्या भेटीनंतर दिघेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार ते उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील सर्वोच्च नेते होते, ते असं करतील असं वाटलं नव्हतं, असंही केदार दिघे म्हणाले होते.
त्यांनंतर सुरु झाली ठाकरे घराण्याची निष्ठा यात्रा. आदित्य ठाकरे यांनी कोणतीही वेळ न दवडता निष्ठा यात्रा, शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली. मुंबईतील अनेक शाखांना, ठाण्यातील अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली.
ज्यावेळी ठाण्यात आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरु झाला, त्या सगळ्याची सुरुवात आनंद दिघे यांच्या पुतण्याच्या स्वागतापासून झाली. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला धर्मवीरांच्या ठाणे जिल्ह्यातील सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार, असं मत केदार दिघेंनी मांडलं आहे.
मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या निष्ठा यात्रेला #धर्मवीरांच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेनी, #शिवसेनेच्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आशीर्वाद व प्रचंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार…@AUThackeray @OfficeofUT pic.twitter.com/PoZyxq9q8U
— Kedar Dighe (@KedarDighe1) July 23, 2022
केदार दिघे यांच्याकडे सध्या शिवसेनेचं कुठलंच पद नाही, हे महत्त्वाचं. आनंद दिघे हे नेहमी शिवसेनेशी एकनिष्ठ होते. बाळासाहेब हे आनंद दिघे यांचे गुरु होते. मातोश्रीशी एकनिष्ठ हा एकच मंत्र आनंद दिघे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता, आता त्याच मार्गावर चालण्याचा विचार केदार दिघेंनी केला असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केदार दिघे हे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे असणं हादेखील भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचं म्हटलं जातं.