राज ठाकरेंना शिवसेना का हवी? मनसे शिवसेनेच्या मागे का लागलेय?
शिवसेनेचे खरे मालक कोण, यावरून सध्या लढाई सुरू आहे. त्या लढाईत मनसेनेही उडी घेतली आहे का?

Raj Thackeray : तुम्ही म्हणाल की आम्ही उगाच काहीतरी म्हणतोय, पण तसं नाही. राज ठाकरे यांच्या आजकालच्या प्रतिक्रिया, मनसैनिकांनी मांडलेली मतं, यांचा विचार केला तर राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेला शिवसेना पक्ष हवाय का, असा सवाल केला जात आहे. त्याचं उदाहरणही आम्ही तुम्हाला देऊ.
25/07/2022 रोजी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलंय. त्या ट्विटमध्ये काय म्हटलंय त्याच्या शब्दश: अर्थ जरी काढला तरी आम्हाला काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला समजून येईल.
अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा pic.twitter.com/2QxhYD8OeR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 25, 2022
राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ट्विट करुन देशपांडेंनी एक वाक्य पोस्ट केलंय. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा’ या वाक्याचा अर्थ काय तेही आमच्या शब्दातून समजून घ्या.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्माला घातलं. पहिल्यांदा मराठीचा मुद्दा, त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यातून शिवसेना अनेक ठिकाणी टक्कर देताना दिसते, मात्र या सगळ्यात शिवसेनेचे खरे मालक जरी शिवसैनिक असले तरी त्याची सगळी मालकी ही बाळासाहेब ठाकरेंकडे असायची. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत शिवसेनेचा वारसदार म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जायचं.
कारण राज ठाकरे हे तंतोतंत बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे मतं मांडायचे, बाळासाहेबांप्रमाणे काम करायचे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा राज ठाकरे शिवसेनेमध्ये अॅक्टिव्ह होते, तेव्हा उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय नव्हते. त्यामुळे असं म्हटलं जायचं की शिवसेनेचा पुढचा उत्तराधिकारी राज ठाकरे असतील, मात्र तसं झालं नाही, शिवसेनेचे खरे उत्तराधिकारी उद्धव ठाकरे झाले. त्यानंतर राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत: पक्ष निर्माण केला. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे शिवसेनेत असताना राज ठाकरे हेच सेनेचे हकदार होते, अशी अनेकांची समज होती.
राज ठाकरे सेनेतून बाहेर पडून 14 हून अधिक वर्षे झाली, मात्र त्यांच्या पक्षाला हवं तितकं यश मिळालं नाही, मात्र शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवलंय. मधल्या काळात असंही म्हटलं जायचं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कधी ना कधी एकत्र येतील, मात्र अद्यापतरी तसं झालं नाही.
राज ठाकरेंच्या मनसेला शिवसेनेचा पाठिंबा मिळाला तर मनसेला बूस्टर मिळेल, याची जोरदार चर्चा सुरुय. मात्र सध्यातरी तसं होईल, असं वाटत नाही. पण थेट संदीप देशपांडेंच्या ट्विटचा अर्थ काढायचा झाल्यास पक्षप्रमुखांचा मुलगा पक्षप्रमुख होणार नाही तर पक्षप्रमुख पदाचा खरा हकदारचं पक्षप्रमुख होईल, असं मत संदीप देशपांडे यांना मांडायचं आहे का? असा सवाल आता समोर येतोय.