बाळासाहेबांची एकच गोष्ट जमली आणि संजय राऊत सेनेत फीट बसले…
मित्रांनो इथं टाईमिंगची खूप मोठी कसरत आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षातील 40 आमदारांनी बंडखोरी केली.

Sanjay Raut Shivsena : संजय राजाराम राऊत! पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी प्रवीण राऊत यांना मुख्य आरोपी म्हणून ताब्यात घेतलंय. प्रवीण राऊत यांच्याशी संबंध असल्याने पत्राचाळ घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांचा हात असल्याचा अंमलबजावणी संचालनालयला (ED ला) संशय आहे. आता याच आरोपांखाली संजय राऊत यांना 01 ऑगस्ट 2022 अटक करण्यात आलीये, मात्र या सगळ्यात चर्चा होतेय ते म्हणजे त्यांच्या धाडसाची.
मित्रांनो इथं टाईमिंगची खूप मोठी कसरत आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षातील 40 आमदारांनी बंडखोरी केली.
बंडखोर आमदार आणि खासदार यांच्यामधील अनेकजणांवर ED किंवा CBI चे खटले दाखल आहेत. त्यातच संजय राऊत यांना अटक होण्याच्या काही दिवस आधी जालनाचे माजी आमदार अर्जून खोतकरांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे. ‘मला आणि कुटुंबाला होणाऱ्या त्रासामुळे मी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देत आहे.’ त्यामुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना घाबरून काही आमदारांनी भाजपला साथ दिली, असं म्हटलं जातंय.
नागरिकांमध्ये एक समज झालाय की संजय राऊत हे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना न घाबरता थेट अटकेत गेले. आता या सगळ्यात संजय राऊतांची शिवसेनेत एन्ट्री कशी झाली, असा प्रश्न अनेकांना पडलाय. आता आम्ही त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार आहोत.
राऊत हे शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत, तर मुख्य संपादिका रश्मी उद्धव ठाकरे या आहेत. शिवसेनेच्या 17 प्रमुख नेत्यांच्या यादीत संजय राऊत यांचं नाव आहे. शिवसेनेचे चार टर्म राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा एक चेहरा म्हणूनही संजय राऊत यांची ओळख आहे.
क्राईम विभागाचे नामवंत पत्रकार म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे. 1989 ला दैनिक सामना पेपर सुरु झाला आणि संजय राऊत यांच्यावर 1993 साली कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी येऊन ठेपली.
गुन्हेगारी क्षेत्रावर पत्रकार म्हणून संजय राऊत यांची चांगली पकड होती. त्यामुळे राऊतांची चांगली ओळखही होती. संजय राऊत यांची बातमी लिहण्याची पद्धत बाळासाहेब ठाकरे यांना खूप आवडली होती. मधल्या काळात संजय राऊत यांच्या बातम्या बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेतून जात असत. संजय राऊत यांची भाषाशैली बाळासाहेब ठाकरेंच्या ठाकरी शैलीशी मिळतीजुळती असायची, असे त्यावेळेचे लोक सांगतात. त्यामुळे बाळासाहेब असताना त्यांनी अनेक लेखांवर काम केलं आणि ते बाळासाहेबांना पटायचं.
ठाकरे यांच्या काळातील नेते सांगतात की कधी कधी बाळासाहेब फक्त संकल्पना सांगत किंवा एखादी ओळ सांगत, त्यावरुन संजय राऊत यांचा अग्रलेख पूर्ण व्हायचा, याचं अनेकांना आश्चर्य वाटायचं.
“सामनामध्ये आल्यानंतर ठाकरेंची स्टाईल आत्मसात करणं, बाळासाहेबांचं म्हणणं समजून घेतल्यानंर तो लेख लिहणं, किंवा एखाद्या विषयावर बाळासाहेबांची भूमिका काय असू शकते, याचा अंदाज लावून लेखन करणं, हे संजय राऊत यांना चांगलं जमायचं.
संजय राऊतांची कार्यपद्धती, त्यांचं थेट लिखाण बाळासाहेबांना आवडायचं आणि यामुळेच बाळासाहेबांना संजय राऊतही आवडायचे. त्यामुळे दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक असताना बाळासाहेबांनी संजय राऊत यांना राजकारणात अधिकृत प्रवेश दिला. तिथूनच त्यांची राज्यसभेची वारी सुरु झाली आणि आता संजय राऊत हे शिवसेनेचे मुख्यप्रवक्ते आहेत.