ठरलं! संजय राऊतांचं ‘या’ विषयावर पुस्तकाचं लिखाण सुरु, थेट तुरुंगातून…
पत्राचाळ घोटाळ्यामध्ये संजय राऊतांचा हात असल्याचा ED ला संशय आहे, म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Sanjay Raut Book : ज्यांनी राजकारण पाहिलंय, समजून घेण्याचा प्रयत्न केलाय, त्यांना ‘संजय राऊत’ हे नाव माहिती नाही, असा कोणीच नाही. त्यातल्या त्यात संजय राऊत आता काय करत आहेत, असा सवाल जरी त्या लोकांना केला, तर त्यांचं उत्तर एकच असेल ते म्हणजे ते तुरुंगात आहे. ED ने त्यांना अटक केलेय. पत्राचाळ घोटाळ्यामध्ये त्यांचा हात असल्याचा ED ला संशय आहे, म्हणून राऊतांवर कारवाई केलेय, असंही म्हटलं जातंय.
आता असं सगळं असताना अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पत्रकार, शिवसेना खासदार संजय राऊत हे तुरुंगात राहून एक पुस्तक लिहीत आहेत. आता त्या पुस्तकाचा विषय काय, पुस्तकात कोणते मुद्दे असतील, पुस्तकाचं नाव काय, ते पुस्तक कधी वाचायला मिळणार, अशा सगळ्या प्रश्नांवर उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
आम्ही संजय राऊत यांचा पत्रकार म्हणून उल्लेख यासाठी करतोय, कारण राजकारणात येण्याआधी संजय राऊत हे पेशाने पत्रकार होते, बाळासाहेब ठाकरे यांना राऊतांचे लिखाण खूप आवडायचे. त्यामुळे बाळासाहेबांनी संजय राऊतांना सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक पद दिले. त्यानंतर संजय राऊतांचे लिखाण हे बाळासाहेबांच्या आदेशाने होऊ लागले. शिवसेनेला गरजेची असलेली भाषा, संजय राऊत लिहू लागले होते. शिवसेनेची भूमिका शिवसैनिकांपर्यंत योग्यरित्या पोहचवण्याचं काम सामनाच्या माध्यमातून संजय राऊत करु लागले होते, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की संजय राऊत हे शिवसेनेला साजेशं असं योग्य लिखाण करत होते. आता त्याच लिखाणाच्या शैलीचा वापर करुन संजय राऊत पुस्तक लिहीत आहेत, अशी माहिती आहे.
20 जुनला विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. त्याच रात्री एकनाथ शिंदेंनी बंड केलं. ते बंड आतापर्यंत सक्सेस झालं. यावेळी उद्धव ठाकरे यांचा अग्निपरीक्षेचा काळ होता. ठाकरेंच्या बाजूने असलेले अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या बाजूने जाऊ लागले होते. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या अनेक बाजू माध्यमांच्या माध्यमातून समोर येऊ लागल्या होत्या, मात्र उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर होणारं नियोजन तितकसं समोर येत नव्हतं, कदाचित संजय राऊतांच्या पुस्तकातून हेच मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत शिवसेनेची जडणघडण, शिवसेनेला सोडून गेलेल्या नेत्यांची परिस्थिती, एकनाथ शिंदेंचं बंड, आपल्याला झालेली अटक, भाजपकडून मिळणारी वागणुक, हिंदुत्वाचा मुद्दा, बाळासाहेब ठाकरेंची शिकवण, मातोश्रीशी इमान, अशा अनेक मुद्द्यांच्या अधारे हे पुस्तक लिहलं जाण्याची शक्यता आहे.
31 जुलैला संजय राऊतांना ED ने अटक केली, त्यानंतर त्यांचा मोठा काळ हा तुरुंगात गेला आहे. त्यामुळे संजय राऊतांना पुस्तक लिहण्याला साजेशा असा वेळ मिळाला आहे, याच काळात ते आपलं पुस्तक लिहून पुर्ण करण्याची शक्यता आहे.
याआधी 2019 मध्ये कधी नव्हे ते राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी झाली होती. त्यावेळीही राज्यात अनेक नाट्यमय घटना घडल्या होत्या. 36 दिवसांच्या याच घडामोडीवर पत्रकार कमलेश सुतार यांनी एक पुस्तक लिहलं होतं, त्या पुस्तकाची देश पातळीवर दखल घेतली होती, कदाचित आताच्या राजकीय घडामोडींच्या आधारावर संजय राऊतांच्या पुस्तकाचीही मोठी दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.
येत्या सहा महिन्यात हे पुस्तक तुम्हाला वाचण्यास मिळू शकते, संजय राऊत हे शिवसेनेतील ठाकरे गटाच्या बाजूने असल्याने असंही म्हटलं जातंय की या पुस्तकातून एक बाजू समोर येऊ शकते, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी बंड का केलं, त्यांच्यामागे इतके आमदार का निघून गेले, यावर कोण पुस्तक लिहणार का, हे पाहणं गरजेचं आहे.