
Widow Marriage : काही शतकामध्ये मुंबईवर अंधश्रद्धा आणि पुराणतवादी लोकांची पकड होती. पण या 1840 च्या शतकाच्या सुरुवातीपासून सुधारकांचा एक वर्ग पुढे येऊ लागला त्यामुळे अशा गोष्टींना आळा बसू लागला.
त्या काळी हिंदू उच्चवर्गीय तरुण विधवांना पुनर्विवाहावरील बंदी मोठ्या भेडसावत होती. काही लोक दुर्दैवी आणि निराधार विधवांचा गैरफायदा घेत होते, त्यामुळे भ्रूणहत्या ह्यांचे प्रमाण वाढत होते. त्या वेळच्या वर्तमानपत्रात 8 सप्टेंबर 1840 या दिवशी ठाकुरद्वारच्या देवळात कपड्यात गुंडाळून नवजात अर्भकाच्या प्रेताची बातमी आली होती. त्या प्रेताभोवती खालच्या वर्गातल्या पुष्कळ महिला जमल्या होत्या. ते मूल कोणत्या तरी उच्च वर्गातील विधवा बाईच्या अनैतिक संबधातून जन्मले होते, आणि तिनेच त्याचा गळा घोटला होता. अशी चर्चा सुरु होती.
अशा तऱ्हेच्या घटना नेहमी घडत होत्या, पण त्यांची नोंद क्वचितच घेतली जात होती. पुढे समाजसुधारकांनी लोकांना आपल्या लिखाणातून आवाहन केले होते, ‘विधवा स्त्रियांना लग्र करायला मोकळीक द्या. त्यामुळे तुमचा फायदाच होईल, कारण विधवेचे जीवन हे मरणाहून खडतर असते. बालविवाह करून स्त्रियांना असले जीवन जगण्यास तुम्ही भाग पाडू नका. ह्यापुढे कुठल्याही विधवा तरुणीची अशा तऱ्हेने आहुती देऊ नका.” अस आवाहन केलं गेलं.
त्या काळी पाठारे प्रभू हे पाश्चिमात्य कल्पना आणि सुधारणा उचलून धरण्यात आणि अंमलात आणण्यात अग्रेसर होते. त्यांनी प्रथम आपल्या समाजात विधवा-विवाहाची पद्धत सुरू करण्याचे ठरवले. पण इतर बाबतीत सुधारक वृत्तीचे असलेले ह्या समाजातील बहुसंख्य लोक विधवा विवाहाच्या बाबतीत मात्र आपल्या जुन्या मतांना घट्ट धरून होते. तेव्हा रावबहादुर मोरोबा कान्होबा विजयकर नावाच्या न्यायाधीशांनी हे आव्हान स्वीकारले होते.
न्यायाधीश पुण्याहून मुंबईच्या स्मॉल कॉज कोर्टात बदलून आले होते, त्यांनी स्वतः च्या विधवा मुलीचे एकाकी जीवन पाहून तिच्यासाठी अनुरूप जोडीदार पाहिला आणि लग्न करून देऊन विधवा-विवाहास प्रतिबंध करणाऱ्या जुन्या रूढीवर मात करण्याचे ठरवले. पण खुद्द त्यांच्या स्वतः च्या कुटुंबीयांकडूनच त्यांना जबरदस्त विरोध झाला. त्यांच्या पत्नीला नवऱ्याचे हे विचित्र वागणे पसंत पडले नाही आणि तिने विहिरीत उडी टाकून जीव दिला. ह्या घटनेमुळे जनतेमध्ये प्रचंड खळबळ उडाली आणि नियोजित विधवा विवाह रद्द करावा लागला. तरीही रावबहादुर विजयकर हे विधवा-विवाहाच्या बाजूने सातत्याने शेवटपर्यंत प्रयत्न करत होते.
त्या दृष्टीने सन 1863 मध्ये त्यांनी ‘पाठारे प्रभू रिफॉर्म असोसिएशन’ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेने एक पत्रक प्रसिद्ध करून समाजातील लोकांना असे आवाहन केले की, त्यांनी धीर न सोडता आणि समाजाच्या बहिष्काराला भीक न घालता विधवा-विवाहाला उत्तेजन द्यावे.
ह्या आवाहनामुळे समाजात मोठाच वादंग निर्माण झाला. पुष्कळशा पाठारे प्रभूंची अशी विचारधारणा होती की, विधवा-विवाह हा खालच्या वर्गातील लोकांकरिता ठीक आहे, पण आपल्यासारख्या उच्च वर्गामध्ये हे योग्य नाही. रावसाहेब विजयकरांना आपण काळाच्या फार पुढे जातो आहोत याचे भान नव्हते. त्यांनी समाजसुधारणेच्या तीव्र इच्छेतून 26 मार्च 1870 रोजी स्वतःच एका विधवेशी पुनर्विवाह करून समाजापुढे एक उदाहरण ठेवण्याचा प्रयत्न केला.
याविरुद्ध सर्वांनी तीव्र संताप व्यक्त केला. साहजिकच या जोडप्याला वाळीत टाकण्यात आले आणि ह्या घटनेने एक अघटित असे दुःखद वळण घेतले. एक वर्षाच्या आत म्हणजे 18 फेब्रुवारी 1871 रोजी सकाळी सहा वाजता रावबहादुर विजयकर आणि त्यांची पुनर्विवाहित पत्नी ही त्यांच्या गोवालिया टैंक येथील बंगल्याच्या आवारातील विहिरीत एकमेकांच्या मिठीत मृतावस्थेत आढळली. रावबहादुर विजयकर 60 वर्षाचे, तर त्यांची पत्नी तेवीस वर्षांची होती.
हे प्रकरण येथेच संपले नाही. ह्या जोडप्याच्या विरुद्ध लोकांच्या भावना एवढ्या तीव्र होत्या की रावबहादुरांच्या नातेवाइकांनी त्यांच्या त्या मृत पत्नीचे शेवटचे किमाकर्म करण्यास नकार दिला. त्यांनी फक्त विजयकरांचे अंत्य संस्कार केले. मात्र नाना मोरजे नावाच्या समाजातील एका पुढाऱ्याने पुढे येऊन विजयकरांच्या पत्नीचे अंत्यसंस्कार करण्याचे धैर्य दाखवले.