आपलं शहरबीएमसी

Azadi Ka Amrit Mahotsav : मायानगरी मुंबईत अशा प्रकारे साजरा होणार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

मुंबई महानगर पालिकेने एकूण 41 लाख ध्वज मुंबईतील नागरिकांना वितरित केले आहेत

Azadi Ka Amrit Mahotsav : भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शनिवार पासून सोमवार, दिनांक 15 ऑगस्ट 2022 पर्यंत संपूर्ण मुंबई (Mumbai) महानगरात घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील प्रत्येक घरी याप्रमाणे एकूण राष्ट्रध्वज तिरंगा पोहोचविण्याचे काम महानगरपालिकेच्या यंत्रणेने बजावले आहे. एवढेच नव्हे तर, या अभियानात व्यापक लोकसहभाग मिळवण्यासाठी मागील पंधरवड्यात महानगरपालिकेने अतिशय व्यापक जनजागृती केली आहे.

घरोघरी तिरंगा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज खरेदी करुन सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतः सुमारे 40 लाख राष्ट्रध्वज खरेदी केले. तर टाटा समुहाने 1 लाख राष्ट्रध्वज महानगरपालिकेला दिले आहेत. असे एकूण 41 लाख राष्ट्रध्वज तिरंगा सर्व 24 विभाग कार्यालये आणि इतर खात्यांच्या माध्यमातून मुंबईतील घरोघरी पोहोचविण्याचे कामकाज प्रशासनाने पार पाडले आहे. 40 लाख साठ्यातील सदोष आढळलेले सुमारे 4 लाख 50 राष्ट्रध्वज देखील तातडीने बदलून संबंधित पुरवठादाराकडून उपलब्ध करुन घेण्यात आले आणि ते देखील वितरित केले आहेत.

त्याचप्रमाणे, या अभियानासाठी महानगरपालिकेने मागील 15 दिवसांत अत्यंत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे. तसेच व्यापक लोकसहभाग मिळण्याच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. मुंबईत आतापर्यंत विविध ठिकाणी मिळून सुमारे साडेचार हजार बॅनर्स, 350 होर्डिंग्ज, सुमारे 100 डिजिटल होर्डिंग्ज, दीड हजार उभे फलक (स्टॅण्डीज), 350 बसथांबा जाहिरात प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यासोबत सार्वजनिक ठिकाणे, व्यापारी संकुल, विविध कंपन्यांची कार्यालये, शासकीय – निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणी सांगितिक उद्घोषणा (जिंगल अनाऊंसमेंट) करण्यात येत आहे. यासोबत मुंबईतील विविध चित्रपटगृहातून चित्रपटांच्या प्रारंभी आणि मध्यंतरावेळी अभियान संदर्भातील दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात येत आहे. वृत्तपत्रीय जाहिराती आणि स्थानिक नभोवाहिन्यांमधून देखील नागरिकांना आवाहन करुन या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. महानगरपालिकेच्या सर्व समाज माध्यमांवर देखील जनजागृतीपर माहिती पुरवली जात आहे.

महानगरपालिकेच्या शाळांद्वारे देखील व्यापक प्रमाणावर उपक्रम राबविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्रभातफेरी, सामूहिक राष्ट्रगीत गायन, निबंध – चित्रकला – रांगोळी – वेशभूषा – भित्तीचित्रे – घोषवाक्ये यासारख्या स्पर्धांद्वारे घरोघरी तिरंगा अभियान संकल्पना सर्वत्र पोहोचविण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या ५१ शाळा इमारतींवर तिरंगा विद्युत रोशणाई करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन अभियंता विभागामार्फत एकूण 243 महत्त्वाच्या इमारतींवर तिरंगी विद्युत रोशणाई केली जाणार आहे. यामध्ये महानगरपालिका पुरातन वास्तू 8, महानगरपालिका इमारती 82, शासकीय इमारती 48, खासगी इमारती 105 याप्रमाणे इमारतींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत दररोज सायंकाळी 6.30 वाजेपासून थोड्या-थोड्या अवकाशाने प्रोजेक्शन मॅपिंग देखील केले जाणार आहे.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात 28 निवासी इमारती – 100 वृक्ष – 60 विद्युत खांब – विविध थोर पुरुषांचे 19 पुतळे याप्रमाणे तिरंगी व सुशोभित विद्युत रोशणाई करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या उद्यान अधीक्षक कार्यालयामार्फत मुंबईतील 165 ठिकाणी दिनांक 10 ऑगस्ट 2022 पासून अमृत महोत्सवी वृक्षरोपण कार्यक्रम सुरु करण्यात आला असून त्यातून 3 हजार 170 वृक्ष लावण्यात येत आहेत. सर्व विभाग कार्यालयांनी देखील आपापल्या स्तरावर नागरिकांचे मेळावे, प्रभातफेरी, ठिकठिकाणी पथनाट्ये, महत्त्वाचे रस्ते आणि पूल व विद्युत खांबांवर एलईडी रोशणाई करुन परिसर सुशोभित केले आहेत. या व्यतिरिक्त देखील वैविध्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा अभियानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments