
Mumbai History : रस्त्यांना आणि गल्लीला दिलेली नावांचा इतिहास आतापर्यंत आपण पाहिला. मुंबईत (Mumbai) काही ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांची नावे देण्यात देण्यात आली आहेत. तर कुठे तेथील लोकांच्या वस्तीमुळे नाव पडली आहेत. तर मुंबईत काही ठिकाणी नाव ही तेथे असणाऱ्या झाडांमुळे देखील पडल्याचा इतिहास आहे.
मुंबईतील रस्त्यांना आणि जागांना नावे देण्याच्या कामे झाडांनी देखील हातभार लावलेला आहे. फोर्टमधील (Fort Area) टॅमॅरिड लेन येथील टॅमॅरिड नावाचा कोणी तरी साहेब असावा असे अनेकांना वाटते. पण टॅमरिंड म्हणजे चिंचेचे झाड त्याच्यावरून हे नाव पडले आहे. लॅबर्नम हा सुद्धा साहेब नसून ते एक झाड आहे, हे लॅबर्नम रोडवरच्या कित्येक लोकांना सुद्धा ठाऊक नसेल. पिपळाच्या झाडावरून पिंपळवाडी, तसंच वडाच्या झाडावरून वडगादी उभी राहिली. गिरगावातील कांदवाडी हे नाव तेथल्या कांद्याच्या गुदामांनी आणले. चिचेच्या झाडांवरून आलेली आणखीन दोन शुद्ध मराठी नावे म्हणजे चिंचपोकळी आणि चिंचबंदर उंबराच्या झाडावरून उंबरवाडी, तसे ताडांच्या झाडांवरून ताडदेव ह्याच भागात ताडदेवाचे देऊळ पण आहे.
नायगाव हा भाग ‘न्याय ग्राम’ ह्या शब्दावरून आलेला आहे. ह्या ठिकाणी राजा भीमदेवाचे न्यायालय आणि राजवाडा होता. न्याय मिळण्याचे ठिकाण ते न्याय ग्राम आणि न्यायग्रामाचा अपभ्रंश नायगाव. शहरातील सांडपाण्याचे मुख्य गटार जिथून वाहत जाऊन वरळीच्या समुद्राला मिळत होते तो भाग नळबाजार म्हटला जाऊ लागला. आता नळबाजार कुठे आणि वरळी पण त्या काळात हे दोन्ही भाग या गटाराच्या नळाने एकमेकांना जोडलेले होते. हे गटार पुढे झाकले गेले आणि त्यावर रस्ता बांधला गेला. हा रस्ता 1867 साली सुरू झाला. डोंगरी हे नाव सरळसरळ डोंगरावरून आले आहे हा भाग पूर्वी डोंगराळ होता आणि नंतर तो भुईसपाट बनवून त्यात घरे बांधली गेली.
दादर म्हणजे वरचा मजला गाठण्याचा जिना. मुंबई बेटाच्या उत्तरेला बने गाव ओलांडल्यानंतर थोडा चढ चढून मुंबईत येता येत असे म्हणून चढायच्या ह्या भागाला नाव पडले दादर. भायखळ्याच्या नावाबद्दल सांगायचे झाले तर मुळात ही जागा माग धान्याचे खळे होते, आणि त्याच्या मालकाचे नाव होते भाया. भायाचे खळे आणि त्याचा झाला भायखळा.