नानांमुळे अख्खी महाविकास आघाडी कोसळायला सुरुवात झाली, हे सत्य आहे का?
जेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेसने प्रदेशाध्यक्षबदलीचा विचार सुरु केला, तेव्हा महाराष्ट्राचे नवे काँग्रेस अध्यक्ष म्हणून नानांनी जबाबदारी स्विकारली.

Nana Patole : नाना पटोले, हे सध्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. आता तुमच्या मनात एक सवाल असेल की महाविकास आघाडी कोसळण्याच्या मुद्द्यावर नानांचा काय संबंध. तर थेट संबंध आहे, असं म्हणणं चुकीचं ठरले, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी निर्माण झाल्यापासून आतापर्यंत नाना पटोलेंमुळे महाविकास आघाडीसमोर कशा अडचणी आल्या तेच पाहणार आहोत.
असं म्हटलं जातं की नाना पटोले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जवळचे. राहुल गांधी यांच्याशी थेट संबध असल्याने नाना पटोलेंची दिल्लीत चांगली कमांड आहे. आता याच कमांडचा विचार करुन नाना पटोलेंना महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्ष बनवलं.
विधानसभा अध्यक्षाला महाराष्ट्रासह देशात सर्वोच्च स्थान आहे, असं म्हटलं जातं की विधानसभा अध्यक्षाच्या आदेशांमध्ये अनेकदा न्यायालयही दखल घेत नसतं (अपवादात्मक घटना सोडून). मात्र नाना पटोलेंनी या अध्यक्षपदाचा त्याग केला.
जेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेसने प्रदेशाध्यक्षबदलीचा विचार सुरु केला, तेव्हा महाराष्ट्राचे नवे काँग्रेस अध्यक्ष म्हणून नानांनी जबाबदारी स्विकारली. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेसने त्या पदावर कुठला उमेदवार दिलाच नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने जितक्या वैधानिक गोष्टी होत्या, त्या टांगत्या राहिल्या. नानांची जबाबदारी अपसुकच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांवर आली. ज्या पक्षाचा विधानसभा अध्यक्ष, त्या पक्षाची विधानभवनात ताकद, असं साधं समिकरण आतापर्यंत माणलं जातं, मात्र तीच ताकद काँग्रेसने बाजूला केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळे नेते ‘येणाऱ्या निवडणुका एकत्र लढणार असं सांगत असताना नाना पटोले हे एकमेव व्यक्ती होते, जे भविष्यातील निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार म्हणून ठामपणे सांगत होते.’ नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये चंचलता निर्माण झाली होती.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात होते, त्यामुळे बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्यात अनेक मुद्द्यांना घेऊन चर्चा झाली होती, मात्र अचानक नाना पटोले आल्यानंतर काँग्रेसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षातील नेत्यांना काँग्रेसची भूमिका समजणं कठीण झालं होतं.
नाना पटोलेंनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनाच अनेक आव्हानं दिली होती, त्यावर चर्चा सुरु असतानाच अचानक शिवसेनेच्या नेत्यांनी बंड केलं, असं असताना काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावेळेसही नाना पटोलेंनी असं एक विधान केलं, ज्यामुळे त्या मुद्द्याला घेऊनही चर्चांना उधाण आलं.
महाविकास आघाडी ही नैसर्गिक युती नाही, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे नेते सोनिया गांधी यांच्याकडे सरकार स्थापनेसाठी गेले होते, असं मत नाना पटोलेंनी माडलं आणि पुन्हा महाविकास आघाडी कुठेतरी धोक्यात आहे का, असं विचारलं जात आहेत.
नाना पटोले यांनी दिलेल्या अनेक आव्हानांमुळे महाविकास आघाडीला उतरती कळा लागलेय का, असा सवाल आता समोर येऊ लागलाय, त्यामुळे नानांमुळे अख्खी महाविकास आघाडी कोसळायला सुरुवात झाली का, हाच सवाल आम्ही विचारत आहोत.